आद्य ग्रंथ

मराठी साहित्याचा आरंभ
इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत मराठी भाषेची चिन्हे शोधत जाता येते. या आधीच्या काळातही तिचे अस्तित्व असावे याचेही काही उल्लेख आढळतात. मात्र, ‘लीळाचरित्र’ अथवा ‘ज्ञानदेवी’च्या आधीचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आद्य मराठी ग्रंथ कोणता हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा आद्यग्रंथ असे समजले जात होते. परंतु साहित्यसंशोधकांच्या मते तो इ.स. ११८८ च्या बराच अलिकडचा, म्हणजे ‘ज्ञानदेवी’ नंतरचा (इ.स. १२९०) असावा. इ.स. १२७८ च्या सुमारास रचला गेलेला ‘लीळाचरित्र’ हाच आद्यग्रंथ ठरतो असे अभ्यासकांचे मत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘श्रीपतिकृत मराठी ज्योतिषरत्नमाला शक ९६१ सुमार’ या लेखात श्रीपतिगृह विरचित ज्योतिषरत्नमाला या संस्कृत ग्रंथाची त्याने स्वतःच केलेली टीका हा मराठीतील पहिला उपलब्ध ग्रंथ होय असे म्हटले आहे. मराठी वाङ्मयकोशात (खंड पहिला, संपादक श्री. गं. दे. खानोलकर) म्हटले आहे. ‘श्रीपतींची मराठी टीका गद्यात असून ती त्यांनी इ.स. १०५० मध्ये लिहिली. हा टीकाग्रंथ मराठीतील प्राचीनांत प्राचीन असा पहिलाच (उपलब्ध) गद्य ग्रंथ आहे असे आज तरी मानावयास हरकत नसावी.’ प्रा. श्री. रं. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ‘शक ९६१ च्या पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि ज्योतिषरत्नमालेचा (मराठी टीकेसह) काल याच सुमाराचा असल्याने श्रीपतिभट्ट, विरचित ज्योतिषरत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतला आद्यग्रंथ ठरतो.’(राजवाडे समग्र साहित्, खंड दुसरा, प्रस्तावना)
ज्योतिषरत्नमाला, विवेकसिंधु, लीळाचरित्र, ज्ञानदेवी या आरंभीच्या उपलब्ध ग्रंथांखेरीज मराठीत लिहिले गेलेले साहित्य असले पाहिजे. ग्रंथलेखनासाठी आज जशी सामग्री उपलब्ध आहे तशी प्राचीन काळी नव्हती. कागदावर लिहिलेले उपलब्ध असे प्राचीनतम हस्तलिखित म्हणजे विठ्ठल गलंडकृत ‘रसकीमोदी’ची इ.स. १५३४ मध्ये लिहिली गेलेली प्रत हे होय. त्र्यं.शं. शेजवलकर यांच्या मते पंधराव्या शतकापर्यत कागदाचा प्रसार महाराष्ट्रात नव्हता. ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात बहामनी राजवटीत दौलताबाद, जुन्नर वगैरे ठिकाणी कागदाचे कारखाने निघू लागलेले असावेत. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांच्या पश्चिम किनाऱ्यावरील आगमनामुळे त्यांच्या कागदाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश झाला. (शेजवलकर, १९६४) इरफान हबीब यांच्या मते, इ.स.१२२३-२४ मध्ये गुजरातमध्ये कागदावर लिहिलेले हस्तलिखित सापडले आहे. (हबीब, १९९६ : ३२) महाराष्ट्रात लेखनासाठी ताडपत्रांचा आणि कापडाचा वापर होत असावा. शिवकालापासून पुढे शिलालेख, ताम्रपट, कार्पासपट मागे पडून कागद सर्वत्र रूढ झालेला दिसतो. (शेजवलकर, १९६४) लेखननिविष्ट वाङ्मय थोडेफार असेल, पण त्याहून मौखिक वाङ्मय बरेच असण्याची शक्यता आहे. राजवाडे यांच्या मते, शक १०५१ त (इ.स.११२९) मराठीत पद्य सारस्वत होते. ज्ञानदेवीपूर्वी १६१ वर्षे मराठीत पद्य सारस्वत होते हे आता निश्चित आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे.
इ.स.११२९ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ अथवा ‘अभिलषितार्थचिंतामणी’ तील मराठी पदापासून इ.स.१२९० मध्ये लिहिल्या गेलेल्या ज्ञानदेवीपर्यंतच्या मधल्या दीडशे वर्षात काहीही साहित्यनिर्मिती झालेली नसणे अशक्यच आहे. ती उपलब्ध नाही एवढेच. उपलब्ध ग्रंथांच्या आधाराने मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादवकालात होतो. सातवाहन ते यादव हा जसा राजवटींमधल्या बदलाचा काळ आहे तसाच महाराष्ट्री-प्राकृत, महाराष्ट्री-अपभ्रंश, मराठी हा भाषित परिवर्तनाचाही काळ आहे. साहित्यात संस्कृतऐवजी प्राकृताचा अवलंब ही गोष्ट जरी सातवाहनांच्या काळात घडलेली असली तरी धर्मकारणासाठी मराठीचा अवलंब ही घटना यादवकाळातच घडलेली आहे. मराठीच्या आरंभकाळातले उपलब्ध साहित्य मनोविनोदनासाठी लिहिले गेलेले साहित्य नसून जनसाधारणांच्या आध्यात्मिक मुक्तीसाठी लिहिले गेलेले आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना केवळ राजवटींचा इतिहास उपयोगाचा ठरत नाही. राजवटींबरोबरच विविध ग्रंथ आणि संप्रदाय यांचाही मागोवा घेणे अटळ ठरते. मराठीतल्या आरंभकाळातल्या साहित्याला विविध उपासना पंथांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यातला अत्यंत महत्त्वाचा पंथ म्हणजे नाथपंथ होय. नाथपंथ हा यादव साम्राज्यातला एक प्रभावी संप्रदाय होता. डॉ. जोगळेकर यांच्या मते, महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून प्रभावशाली ठरलेल्या महानुभाव, वारकरी आदी सर्व संप्रदायांचा मूलस्रोत नाथसंप्रदायच आहे आणि नंतरच्या संप्रदायांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नाथसंप्रदायाचीच तत्त्वे अंगिकारली आहेत असे दिसून येते. रा.चिं.ढेरे यांच्या मते, नाथसंप्रदायाची प्रथम लीलास्थली आहे. (जोगळेकर, १९८४ : १७४)
यादवकाळात साम्राज्यविस्तार झालेला होता, मंदिरे बांधली जात होती, दाने दिली जात होती. व्रतवैकल्ये यांना महत्त्व दिले जात होते, परंतु एकंदरीत समाजव्यवस्थेचा ताणाबाणा पाहिला तर सामान्यजन आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर अभावांनी ग्रस्त होते असेच म्हटले पाहिजे. राजवटीच्या आश्रयाने समाजातला एक विशिष्ट स्तर फोफावत जातो आणि बाकीचा समाज समृद्धीच्या फळांपासून वंचित राहतो. यादवकाळातल्या संस्कृत साहित्याचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नव्हता. पंडित आणि राजाच्या दरबारासाठीच ते लोक लिहित होते. संस्कृतमध्ये साहित्य विपुल लिहिले गेले पण त्यात मौलिकता, चैतन्य आणि प्रेरकतेचा अभाव होता.
ज्योतिषरत्नमाला
‘श्रीपति भट्ट’ याने १०३९ च्या सुमारास मूळ संस्कृतात हा ग्रंथ रचला व त्यावर संस्कृतात व मराठीत टीकाही लिहिली. मराठीत उपलब्ध असलेली ही टीका अपूर्ण आहे. या ग्रंथाची एकूण ७४ पृष्ठे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना सापडली व तीही मूळ मराठी पोथी नसून त्यांच्या मते, १४४७ च्या सुमारास केव्हा तरी केलेली तिचा नक्कल आहे. ही पोथी राजवाडे यांनी १९९४ साली ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वार्षिक इतिवृत्तांत छापून प्रसिद्ध केली. ‘तेया ईश्वररूपा कालाते मि ग्रंथकर्ता श्रीपति नमस्कारी ।।’ अशी सुरुवात करून प्रस्तृत ग्रंथात श्रीपतीने युगे, संवत्सरे, त्यांचे स्वामी, ऋतू, मास, राशी, तिथी, महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व व त्या दिवशी करावयाची कर्तव्ये, शुभाशुभ योग इत्यादींची चर्चा केली आहे. मराठीतल्या हा या प्रकारचा पहिलाच ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच. परंतु राजवाडे यांच्या मते, या ग्रंथांतील भाषेचे स्वरूप पाहता तो ‘मराठीतील आद्य ग्रंथ’ आहे. राजवाडे यांच्या या मताशी इतर वाङ्मयेतिहासकार व संशोधक सहमत नाहीत.
लीळाचरित्र
महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास. लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या. चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत. लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात.
विवेकसिंधु
मुकुंदराजाने हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला. प्रा.कृ.पां.कुळकर्णी आणि वि.ल.भावे या ग्रंथाला मराठीतील आद्य ग्रंथ मानतात. हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्वीचा असे त्यांचे मत होते. नवीन संशोधन हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला असे मानते. विवेकसिंधु हा ग्रंथ उपनिषदांच्या मंथनातून तयार झालेला, शांकर अद्वैत मताचे प्रतिपादन करणारा आहे. विशेषतः ‘योगवासिष्ठ’ या ग्रंथाचा प्रभाव या ग्रंथावर आढळतो. मायावादाचे सूत्रबद्ध विवेचन या ग्रंथात केले आहे. विवेकसिंधुत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून एकूण १८ प्रकरणे आहेत. १६८४ पर्यंत ओवी संख्या आहे. गुरु-शिष्यसंवाद रूपाने येथे ब्रह्मज्ञान सांगितले आहे. शास्रीय विषयाचे यात निरूपण आले आहे. पहिल्या भागात सृष्टीची उभारणी, दुसऱ्या भागात सृष्टीचा संहार आणि जीव, प्रपंच, परमेश्वर, जीव मुक्ती यांचे विवेचन केले आहे. ‘ग्रंथीचे हेंचि चातुर्य । जे रोकडे स्वानुभव सौंदर्य । म्हणौनि सेवीतु मुनिवर्य । विवेकसिंधु हा ।।’ असे भाषासौष्ठव असणारा हा ग्रंथ रचनादृष्ट्या सुंदर आहे. त्यात लेखकाची बहुश्रुतता दिसते. प्रतिभासृष्टी संपन्न व समृद्ध आहे. कल्पनाविलास व विविध अलंकाराची योजना त्यात आहे. मराठीचा गौरव ‘धुळी आंतील रत्न । जरि भेटे न करिता प्रेत्न । तरी चतुरी येत्न । का न करावा ।’
या शब्दांत केला आहे. ‘ मराठी भाषेतल्या वेषातला शांकरमठातला सुबोध वेदान्त पाठ ’ म्हणजे विवेकसिंधु असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी म्हटले आहे
. संदर्भः संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश - खंड १
संपादकः जया दडकर, प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, सदानंद भटकळ

Comments

Popular posts from this blog

महानुभाव पंथाची माहिती (मराठी आणि हिंदी मध्ये)महानुभाव पंथ तथा जय कृष्णी पंथ स्थापना

MAHANUBHAV PANTH INFORMATION (ENGLISH)